कराड : सातारा जिल्ह्यातील कराड विमानतळ हे मध्यवर्ती विमानतळ आहे. विमानतळावर माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र (Pilot Training Center) सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत येथील विमानतळावर नाईट लँडिंगही करण्यात आले असून, ते यशस्वी झाले आहे.
कराड विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती अँबिशिएन्स एव्हिएशन फ्लाइंग क्लबच्या वतीने संचालक परवेझ दमानिया (Parvez Damania) यांनी दिली. येथील विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाइंग क्लबच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्याची माहिती आज श्री. दमानिया यांनी दिली. विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई, प्रशिक्षण केंद्राचे बेस इन्चार्ज पंकज पाटील उपस्थित होते.
दमानिया म्हणाले, ‘‘येथील विमानतळ हे जास्त एअर ट्रॅफिक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे या विमानतळाचा वापर वैमानिक प्रशिक्षण सेंटरसाठी सुरू करता येईल, असा मानस होता. त्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार येथील विमानतळावर हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षांचा करार केला आहे.
प्रशिक्षणासाठीची पाच विमाने या ठिकाणी आणण्यात आली आहेत. अजूनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन सीटची, तर एक विमान चार सीटचे आहे. या विमानांसाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला आहे. येथील विमानतळावर नाईट लँडिंगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. स्थानिकांसह देशभरातील सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या येथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी २०० तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली असल्यामुळे याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे
स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य, तरुणांना रोजगारहीकऱ्हाडमध्ये सुरू असलेल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्रात सध्या स्थानिकांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती स्थानिक पातळीवर करून त्यांना रोजगार देण्यात आला आहे. त्याचबरोबर देशभरातील विद्यार्थ्यांसह स्थानिक विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देण्यासाठी आमचा आग्रह आहे. त्यांनी आवश्यक ती पदवी आणि क्षमता धारण केल्यावर त्यांना येथील प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेता येईल, असेही श्री. दमानिया यांनी सांगितले.



