पुणे ; चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या दूर होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. वाहनचालकांना सतत कोंडीचा अनुभव येत असून कामाचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेल्प रायडर ग्रुपचे प्रशांत कनोजिया म्हणाले, “मुळशी-पौड रस्त्यावरून पाषाण- बावधनकडील पूल महामार्गावर उतरविण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गाची रुंदी कमी झाली आहे. पुलावरून उतरल्यावर डावीकडे वळताना सेवारस्ता आणि पुलावरून येणारी पाषाण- बावधनवरील वाहतूक धोकादायक झाली आहे. पाषाण बावधनला जाणारा पूल हा चुकीच्या ठिकाणी उतरविल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तो पूल पाषाण- बावधनला बंद करून केवळ सातारा बंगळूरच्या दिशेने सुरू ठेवावा. मुख्य एनडीए चांदणी चौकाच्या पुलावरून पाषाण- बावधनला प्रवेश दिल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते. ”
बावधन येथील भगवती मॅस्ट्रोज् सोसायटीतील प्रकाश सोमण म्हणाले, “नवीन चांदणी चौक हा सिग्नल आणि पोलिस विरहित वापरण्यासाठी बनवला आहे. सर्कलला सर्व दिशांनी येणारी वाहने एकत्र होऊन पुढे परत वेगळ्या दिशेने बाहेर पडतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. उलट दिशेने बेफामपणे जाणाऱ्या चालकांना चाप बसविण्याची गरज आहे.”
बावधन खुर्द येथील प्रसाद वालावलकर म्हणाले, “नवीन रस्ते झाले असले, तरी ते दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित नाहीत. गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग नाहीत. रस्त्यावरील दिवे बऱ्याचदा बंद असतात.
माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील म्हणाले, “उड्डाणपूल झाल्यानंतर बावधन मुख्य रस्ता, दिशादर्शक फलक, सेवारस्ता प्रश्न, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासंबंधी समस्या, रस्ते आणि सोसायटी प्रवेशद्वार पातळीमध्ये तफावत असणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
नोंदविलेली निरीक्षणे
1 बावधनकडून कोथरूडकडे जाणारी वाहने सर्रास सर्कलच्या उजवीकडून सेवा रस्त्याला जातात. सर्कलला कोणत्याही दिशेने येणाऱ्या वाहनांची पर्वा न करता बरेच चालक बेफामपणे गाडी घुसवतात. ■ पुलावरून बावधनला येताना विवॉईन हॉटेलला विरुद्ध दिशेने जाणारी वाहने अडथळा ठरतात. ■ ‘अप अँड अबाव्ह’ जवळील वळण धोकादायक बनले आहे. # भुसारी कॉलनीकडून प्रथमेश इमारतीजवळून विरुद्ध दिशेने वाहने बावधनकडे येतात.




