सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल (ता. १०) इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांना चौकशीकामी बोलवून विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या युवकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. काल रात्री साडेनऊच्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या विचारसरणीच्या सुमारे शंभर ते दीडशे युवकांनी एकत्र जमून अचानकपणे दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली.




