नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महागाईच्या मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या देशातील २० टक्के गरीब लोक दररोज महागाईचा सर्वाधिक फटका सहन करतात. पंतप्रधानांनी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र विचलित करण्याच्या कसरती करण्यापेक्षा महागाई कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अन्न आणि खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडत असून, या समस्येचे एकमेव कारण भारतीय जनता पक्ष असल्याचे आता देशाला समजले आहे, असे ते म्हणाले. येत्या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवून या लुटीचा बदला नक्कीच घेईल, असा दावा त्यांनी केला. ‘महागाईच्या मुद्द्यावर – ‘जुडेगा भारत जीतेगा इंडिया’ अशी , टॅग लाईनही त्यांनी आपल्या संदेशात वापरली आहे.
ते म्हणाले की सध्या देशातील २० टक्के गरीब लोकांना ग्रामीण भागात ७.२ टक्के आणि शहरी भागामध्ये ७.६ टक्के महागाईचा – सामना करावा लागतो. ताज्या आकडेवारीनुसार, अत्यावश्यक खाद्यपदार्थांचा महागाई दर सुमारे १० टक्के आहे, अरहर डाळ ३७.१ टक्के, मसाले २८.६ टक्के आणि कांदे २३.२ टक्के, तर दूधाच्या महागाईची दरवाढ २३.२ टक्के आहे असेही त्यांनी म्हटले आहे.



