पुणे : गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री शहरातील गुंडाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत दोन हजार ५४४ गुंडांपैकी ७१७ गुंड त्यांच्या मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. तसेच, पोलिसांनी वेगवेगळ्या भागात गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.
उत्सव काळात शहरातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईतांविरोधात कारवाई करण्यासाठी रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुंडांची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यातील पथके या मोहिमेत सहभागी झाले होते. यामध्ये गुन्हेगार राहत असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली.
तर, गुन्हे शाखेच्या युनिट तीनने पर्वती भागात गंभीर गुन्ह्यातील आरोपी आदित्य युवराज भालेराव (वय १९), ऋतिक दिलीप कांबळे (वय २३), गौरव वामन चव्हाण (वय २३), अजय राजू दास (वय १९, रा. महात्मा फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांना अटक केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसर, तसेच शहरातील लॉज, हॉटेलची तपासणी केली. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करुन २५७ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली.