मुंबई – व्हाट्सअॅप कंपनीने भारतामध्ये पेमेंट सेवा सुरू केली असल्याची घोषणा आज करण्यात आली. यामुळे चॅटच्या माध्यमातून पैसे पाठविता येऊ शकतील. यासाठी यूपीआयचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. याबरोबरच क्रेडिट आणि डेबिट कार्ड उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
व्हाट्सअॅपची पालक कंपनी असलेल्या मेटा या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्ग झुकरबर्ग यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा भारतात जास्त वापर होत आहे. त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून भारत आकर्षण केंद्र आहे. भारतातील व्यापाऱ्यांनी व्हाट्स अॅपसोबत व्यवहार करावा यासाठी ही कंपनी प्रयत्न करीत आहे. भारतातील रेझर पे आणि पेयू या कंपन्यांबरोबर आम्ही काम करत असून, मेसेज पाठविणे जितके सोपे आहे, तितके पैसे पाठविणे किंवा घेणे सोपे व्हावे हा आमचा दृष्टिकोन आहे.
झुकरबर्ग म्हणाले की डिजिटल पेमेंट क्षेत्रात आणि मेसेज क्षेत्रात भारताने जगाचे नेतृत्व केले आहे. या क्षेत्रामध्ये भारतात काम करण्यास आम्ही कमालीचे उत्सुक आहोत. या सेवेमुळे इतर माध्यमाच्या वापर करूनही पेमेंट करता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही सेवा सिंगापूर आणि ब्राझीलमध्ये अगोदरच छोट्या व्यापारासाठी सुरू करण्यात आली होती.


