नागपूर : आमदारांच्या २७ शिवसेना अपात्रताप्रकरणी अद्याप सुनावणीलाच सुरुवात झालेली नाही. राहुल नार्वेकरांवर कुणाचा दबाव आहे का? सुनावणीआधी ते कुणाकुणाला भेटले? याची माहिती घ्यावीच लागेल, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. नागपुरात पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते दाखल झाले होते. त्यापूर्वी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपसह विधानसभा अध्यक्षांवरही टीकास्त्र डागले.
दानवे म्हणाले, अपात्रताप्रकरणी निकाल कधी देणार याच्या तारखा जाहीर करा, अशी आमची मागणी नाही. निकालाच्या तारखा आपल्या हातात नसतात. परंतु सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते की, लवकरात लवकर निकाल द्या. शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ११ मे २०२३ रोजी न्यायालयाने निकाल दिला होता. हा निकाल लागल्यानंतर आता सप्टेंबर महिना संपत आला आहे.
अजूनही या विषयाची सुनावणी सुरू झालेली नाही. अध्यक्ष राहुल नार्वेकर अद्यापही प्रक्रिया कशी करायची यातच गुंतले आहेत. यावरूनच त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असल्याचे दिसत आहे. आमच्यावर दबाव टाकला जातो, असे नार्वेकर म्हणतात. पण, त्यांच्यावर दबाव कुणाचा आहे. केंद्रातील भाजप नेत्यांचा दबाव आहे की, राज्यातील भाजपा नेत्यांचा दबाव आहे. ते कोणत्या दबावाखाली काम करत आहेत, याचीही आगामी काळात माहिती घेतली पाहिजे, असेही दानवे यांनी यावेळी म्हटले आहे.
‘ये डर अच्छा हैं’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. परंतु, हा परदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. यावर दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी या परदेश दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याची सकारला भिती आहे. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हिंदी चित्रपटात एक संवाद आहे. ये डर अच्छा हैं’. ही तशीच परिस्थिती आहे.



