पुणे ; महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. याच वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी महापालिकेस जवळपास १५ वर्षांचा लढा द्यावा लागला. अखेर या लढ्याला उच्च न्यायालयात यश आले असून, येथे भूसंपादन करण्यासाठी न्यायालयात असलेला दावा महापालिकेच्या बाजूने लागला आहे.
पुण्यात २२७, बुधवार पेठ येथील ही ऐतिहासिक वास्तू आहे. भिडेवाडा ताब्यात घेऊन तेथे राष्ट्रीय स्मारक करावे, असा ठराव फेब्रुवारी २००६ मध्ये मुख्यसभेत केला. त्यानंतर जानेवारी २००८ मध्ये स्थायी समितीने त्यास मान्यता देऊन भूसंपादनाद्वारे ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. महापालिकेने सन २०११ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३२७ चौरस मीटर जागेसाठी १ कोटी ३० लाख रुपये मोबदला म्हणून ही रक्कम भूसंपादन विभागाकडे भरली.
मात्र, ही जागा एका बँकेच्या ताब्यात असल्याने तसेच तिथे २४ भाडेकरू होते. त्यांच्यातर्फे महापालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली असल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याने स्थायी समिती व मुख्य सभा ठराव रद्द करण्यात यावे.




