प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह काहीतरी मोठे करण्याचा विचार करत असल्याचे दिसते. अदानी सिमेंटने अलीकडेच 10 बँकांकडून 3.5 अब्ज डाॅलरचे (350 कोटी डाॅलर) कर्जाचे पुनर्वित्त (refinance) केले आहे. या कर्जाची मॅच्युरिटी वेळ तीन वर्षे ठेवण्यात आली आहे. अदानी समूहावरील आंतरराष्ट्रीय संस्थांचा वाढता विश्वास यामुळे हे पुनर्वित्तीकरण शक्य झाल्याचे समूहाच्या वतीने सांगण्यात आले. पण हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स वधारल्यानंतर आता हे पुनर्वित्तीकरण का केले गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अदानी समूहाची काही नवीन योजना आहे का आणि त्यातून काय फायदा होईल?
रिफायनान्सिंग का केले?
अदानी सिमेंटने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ACC आणि अंबुजा सिमेंटचे 6.6 बिलियन डाॅलरमध्ये अधिग्रहण केले होते. हे अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी समूहाने कर्ज घेतले होते. आता यापैकी 3.5 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचे पुनर्वित्त केले गेले आहे. कर्जाचे पुनर्वित्त केल्याने, अदानी सिमेंटच्या खर्चात सुमारे 300 दशलक्ष डाॅलरची बचत होईल असे म्हटले जाते. 350 कोटी डाॅलरची ही पुनर्वित्त प्रक्रिया 10 आंतरराष्ट्रीय बँकांमार्फत पूर्ण केली जात आहे.
कर्ज पुनर्वित्त सुविधा काय आहे?
हप्त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि लाखो डॉलर्सची बचत करण्यासाठी कोणताही मोठा समूह कर्ज पुनर्वित्तीकरणाच्या सुविधेचा लाभ घेतो. यामध्ये कमी व्याजदराच्या अटींवर नवीन कर्ज घेतले जाते आणि जुने कर्ज बंद केले जाते. यानंतर, कमी व्याजदरासह नवीन कर्जाची परतफेड सुरू होते. तुम्ही दुसऱ्या बँकेकडून किंवा त्याच बँकेकडून नवीन कर्ज घेऊ शकता. रिफायनान्सिंगमध्ये, तुम्ही नवीन कर्ज घेता तेव्हा, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्जाचा कालावधी वाढवू किंवा कमी करू शकता. कमी व्याजदरामुळे ईएमआय आणि व्याज दोन्हीचा भार कमी होतो.
या बातमीनंतर अदानी ग्रुपच्या अंबुजा आणि एसीसी सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, ACC शेअर्स 68.55 रुपयांनी घसरले आणि 1962.35 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी अंबुजाचा शेअर 6.45 रुपयांनी घसरून 430.85 रुपयांवर पोहोचला. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 598.15 रुपये आणि निम्न पातळी 315.30 रुपये आहे.