
लखनौ – उत्तर प्रदेशातील आग्रा येथील महिला काॅन्स्टेबलला हातात रिव्हाॅल्व्हर घेऊन रिल बनवणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. रिल व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. संबंधित प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी खजिल होऊन स्वत:च राजीनामा दिला. मात्र त्यानंतर त्यांनी सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी अर्ज केला. अर्जावर विचार सुरु असतानाच लिपीकाने नियुक्तीचे आदेश काढले. याप्रकरणात लिपीक यांना निलंबित करण्यात आले असून महिला काॅन्स्टेबल यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
आग्रा येथे ट्रोल झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या प्रियांका मिश्रा या महिला कॉन्स्टेबलला 2 दिवसांपूर्वी पुन्हा नोकरी मिळाली होती. लिपिक जितेंद्र याने वस्तुस्थिती लपवून पुन्हा नियुक्तीचे आदेश पारित केले. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी लिपिकाचे निलंबन केले. सेवेत परतण्याचा आदेशही रद्द करण्यात आला. महिला कॉन्स्टेबलने यापूर्वी रीलसाठी राजीनामा दिला होता. त्यांना पुन्हा चुकीच्या पद्धतीने भरती करण्यात आल्याने त्यांना 48 तासांत नोकरी गमवावी लागली. आता ही बाब पोलिस विभागात चर्चेचा विषय बनला आहे.