उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कंत्राटी नोकर भरतीचा जीआर मागे घेतला. यावेळी त्यांनी कंत्राटी नोकर भरती करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोप केला. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीसांनी केली. फडणवीसांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत” असं थेट विधान रोहित पवारांनी केलं.
महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लोकांची फसवणूक करत होता, असा फडणवीसांचा आक्षेप आणि आरोप आहे, तुम्ही यावर माफी मागणार का? असा सवाल विचारला असता रोहित पवार म्हणाले, “माझा आक्षेप आणि आरोप असा आहे की, देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत. कारण २०१४ साली जो जीआर काढला होता, तो केवळ एका विभागासाठी मर्यादित होता. जिथे पर्मनंट पदं आहेत, त्याबाबतीत तो जीआर नव्हता. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते (देवेंद्र फडणवीस) स्वत: सत्तेत होते. त्यांचा कंत्राटी नोकर भरतीला विरोध असता तर त्यांनी तो जीआर रद्द करायला हवा होता. पण त्यांनी तो जीआर रद्द केला नाही, उलट त्याचा विस्तार केला.”