
देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांची फसवणूक करत त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनीच जनतेची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातले असल्याचा आरोप करत भाजपकडून मविआविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडले आहे. भाजप हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे भाजप नेते सातत्याने खोटे बोलत असतात, असा टोला त्यांनी लगावला.
कंत्राटी पद्धतीच्या नोकरी भरतीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील जनता विशेषतः तरुण मुले-मुली यांना भाजपचा हा खोटारडेपणा समजतो. राज्यात अडीच लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे भाजप सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी परीक्षा, तलाठी भरती मधील घोटाळा, हे पाप भाजपचेच आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.
काही तरुण मुले मुली दोन-तीन वर्षापासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाहीत. एमपीएससीचा सावळा गोंधळ सुरुच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार यांसारखी अत्यंत जबाबदार व महत्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वतःचे पाप दुसऱ्यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची बोचरी टीका पटोले यांनी केली.