कोल्हापूर: कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतो महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष… पाटील आणि महाडिक यांच्यातला वाद कोल्हापूरकरांना काय नवा नाही. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा विधानसभा आणि सहकार मधील निवडणुका या दोघांमधील संघर्षामुळे आणि एकमेकांच्या ईर्षेने टोकाच्या पातळीवर जात पार पडल्या… जिल्ह्यातील एखादा कार्यक्रमात दोघांनाही आमंत्रण असले तर कोणीही एक जण जायच टाळत आणि आलेच तर एकमेकांपासून लांब बसत. मात्र आज एका कार्यक्रमानिमित्त हे दोघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. शिवाय दोघांनीही एकत्र कोल्हापुरी फेटा ही बांधून घेतला यामुळे अनेक राजकारणांच्या भुवया उचवल्या आहेत.
कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील संघर्ष जसा सर्वांना ज्ञात आहे. तसेच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्री देखील सर्वांना ज्ञात आहे. सध्या हसन मुश्रीफ महायुती सोबत सत्तेत सामील झाल्याने त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना महायुती धर्म म्हणून खासदार धनंजय महाडिक यांच्याशी जवळीक वाढली आहे. तर, मित्र म्हणून काँग्रेस चे आमदार सतेज पाटील यांच्याशी देखील त्यांचे संबंध चांगले ठेवले आहेत. यामुळे आज कोल्हापुरातील कसबा बावडा कृषी विभागाच्या वतीने आज कसबा बावडा प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित पार पडले. कृषी विभागाच्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना निमंत्रित करण्यात आले होते. आणि या कार्यक्रमाला दोघांनीही हजेरी लावली… दाराच्या बाहेर सतेज पाटील तर दाराच्या आत धनंजय महाडिक असे दोघेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची वाट बघत उभारले होते.
इतक्यात हसन मुश्रीफ कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि दोघांनीही त्यांचं स्वागत केलं. तर हसन मुश्रीफ यांनी दोघांना ही सोबत घेत आपल्या बाजूला बसवत तिघांनी ही कोल्हापुरी फेटे बांधले. दोघांच्या मध्ये हसन मुश्रीफ बसले होते तर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक दोघेही पत्रकार आणि लोकांकडे पाहून स्मितहास्य देत होते.
यावेळी हसन मुश्रीफ यांनी दोघेही एकत्र असल्याची संधी साधत मी ज्या-ज्या ठिकाणी असेन तिथं हे दोघे एकत्र असतील. शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य घेणार मात्र निवडणुकीसाठी वेगळ्या वाटा असल्याचे स्पष्ट करत चिमटा काढला. शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत.पण महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करेन अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून आले असून बंटी आणि मुन्ना च्या मधील दुआ मुश्रीफ अशी चर्चा आता रंगू लागली आहे.