मुंबई – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेली मुदत संपायला दोन दिवस आहे. आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आम्हाला आनंदच होईल, अशी भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
रविवारी पत्रकार यांनी मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले, राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याचे दिसत आहे. चांगला निर्णय झाला तर आम्हाला आनंदच आहे. निर्णय कधी घ्यायचा याचा कालावधी ठरलाय असे दिसते. आम्ही देखील सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष ठेवून आहोत. दोन दिवसांनंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल. मार्ग निघून प्रश्न सुटला तर चांगलीच बाब आहे.
आंबेडकरांसोबत राजकीय भेट नाही
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल ते म्हणाले की, आमच्या इंडिया आघाडीत कुणी सामील होत असेल तर त्याचा आम्हाला आनंदच असेल, पण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काल आघाडीत सामील होण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही. ही भेट राजकीय नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाला १०० वर्षे झाली. म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी बोलणार होतो.. प्रकाश आंबेडकरही त्या कार्यक्रमात होते. तिथे त्याविषयीच फक्त बोलणे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी भरतीवरून अजित पवारांना टोला
माझा आशीर्वाद होता हे मी वाचले आहे. मात्र मी काही तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नव्हतो, जाण्याचे काही कारणही नाही. पण सध्या महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. आता एकाचे मत तुम्ही सांगितले. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी यावर एक स्टेटमेंट केले आहे. ज्यावेळी या संबंधीचा निर्णय घेतला त्या बैठकीला आमचे अनेक माजी सहकारी हजर होते. ते आज सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची सहमती होती, असे म्हणत शरद पवारांनी यावेळी अजित पवारांना टोला हाणला. तसेच, एकंदर कंत्राटी नोकरीत स्थैर्य नसल्याने तिला विरोध होत आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले.


