बीड :- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक आदिवासी महिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याशी संबंधित लोकांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
तक्रारीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास चालू आहे. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर पीडित महिला कपड्यांशिवाय रस्त्यावर आरोपींच्या मागे धावली. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. पीडितेनुसार भाजप आमदार सुरेश घस यांच्या पत्नीला गुंडांच्या मदतीने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावायची आहे. प्राजक्ता घस ज्या जमिनीवर दावा करत आहेत ती ६०-७० वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, असा दावा पीडितेने केला आहे.
आरोप फेटाळले
घटनेच्या दिवशी पीडित महिला पती आणि सुनेसोबत चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. त्यानंतर आरोपी राहुल जगदाळे आणि रघू पवार तेथे आले आणि त्यांनी हाणामारी सुरू केली. महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला विवस्त्र केले. मात्र, आमदार सुरेश धस यांनी पत्नीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.



