पुणे : पुणे शहरातील हवा प्रचंड प्रदूषित झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील हवा धोकादायक पातळीच्या वर गेली आहे. त्यामुळे खोकला, ताप, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आदी त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. थंडीत हवेची गुणवत्ता ढासळते आणि म्हणून नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. मास्क वापरावे, असेही आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील हवेमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. सध्या वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढल्याने त्यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बांधकामांच्या धुळीनेही प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पुणेकरांना प्रदूषित हवेचा श्वास घ्यावा लागत आहे. शहरात सरासरी सूक्ष्म (पार्टिक्युलेट मॅटर १०) आणि अतिसूक्ष्म (पीएम २.५) धुलीकणाची पातळी वाईट आणि अतिवाईट दर्जापर्यंत गेलेली आहे. हवेत मिसळणारे धुलीकण हे थंडीमध्ये आकाशाच्या दिशेने वर जात नाहीत, परिणामी हिवाळ्यामध्ये हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते.
…म्हणून हवा प्रदूषित होते
हिवाळ्यामध्ये हवेत गारठा असतो. त्यामुळे हवा स्थिर असते. हवेमध्ये जे धुलीकण येतात, ते आकाशात किंवा जमिनीवर पडत नाहीत. ते हवेतच तरंगतात आणि म्हणून हवा प्रदूषित होते. उन्हाळ्यात या उलट होते की, जमिनीवरील हवा तापते आणि ती हलकी होते. त्यामुळे धुलीकण आकाशाकडे जातात.
अस्थमा रुग्णांनी काळजी घ्या
हवा प्रदूषित असेल तर श्वसनाचे आजार, हृदयरोग, स्ट्रोक, सर्दी, घसा खवखवणे, फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो. ज्या रूग्णांना अस्थमा आहे, त्यांनी तर अतिशय काळजी घ्यायला हवी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी कायम या थंडीमध्ये योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.




