पुणे : शहरातील किमान तापमानाचा पारा कधी वर कधी खाली येऊ लागला आहे. त्यामुळे थंडीचा जोर देखील कमी-अधिक होत आहे. यातच आता पुढील तीन दिवस दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती व पहाटे धुक्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे तूर्तास गारठा कमीच राहणार आहे.
शुक्रवारी (ता. ३) शहरातील किमान तापमान पुन्हा १६ अंशांवर पोचले. मागील दोन दिवस १४ अंशांवर आलेल्या तापमानाने पुन्हा एकदा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे. तर पुणे व परिसरात पुढील आठवडाभर किमान तापमानात काहीशी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे जोरदार थंडीसाठी पुणेकरांना काहीशी वाट पाहावी लागणार आहे. मात्र असे असले तरी पहाटे पडणाऱ्या हलक्या धुक्याचा आनंद लुटण्याची संधी नागरिकांना मिळू शकते.




