पुणे : पुण्याचे पालक मंत्रिपद आणि मराठा मोर्चा राज्यात तापला असताना आजारी पडल्याने राजकीय कार्यक्रमातून अलिप्त राहिल्याने अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी होते. आता आजारपणानंतर डॉक्टरांनी काही दिवस डेंग्यूने त्रस्त असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला असताना शुक्रवारी अचानक पुन्हा सक्रिय झाले. पुण्यात एका ठिकाणी तब्बल एक तास झालेल्या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यानी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले. या घटनाक्रमानंतर राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील एक तासाच्या भेटीत अजित पवार यांनी भाजप समर्थनासाठी शरद पवारांची मनधरणी केली असल्याचा कयास आहे. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन दिलीप वळसे-पाटील यांनी भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा सहकारी बँक, साखर कारखाने आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अजितदादा व शरद पवार संयुक्तपणे कारभार चालवित आहेत. काही खासगी कारखान्यांमध्येही तशीच परिस्थिती आहे. काही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे, तर काही कारखान्यांचा प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे सहकार खाते सांभाळणारे अमित शहा यांची मदत घेण्याबाबतही पवार कटंबात चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात झालेल्या अनेक राजकीय घडामोडी आणि मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण आंदोलनाच्या सर्व घटना घडामोडींपासून अजित पवार पूर्णपणे अलिप्त होते. ते नाराज असल्याचे सांगितले जात असतानाच अजितदादांचे समर्थक मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भमिका घेतली. त्यातच दोन दिवसापासून पुण्यात घडत असलेल्या घडामोडी व पवार कुटुंबाची झालेले एकत्रित बैठक आणि त्यानंतर दिल्लीला जाऊन थेट अमित शहा यांची घेतलेली भेट यामुळे राजकीय चर्चाना उधान आलेला आहे.
दिवाळीचा पाडवा आणि कार्यकर्त्यांची भेट असं समीकरण गेले अनेक वर्ष पार कुटुंबीयांमध्ये सुरू आहे. दोनच दिवसावर येणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीतील सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार का अशी चर्चा राज्यात सुरू आहे. रक्षाबंधन कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित नव्हते त्यामुळे सध्या आजारपणामुळे विश्रांतीसाठी असणारे अजित दादा दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असताना बाणेर येथील एकत्र जमलेल्या पवार कुटुंबीयांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी थेट दिल्लीला जावून अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकारणात उलट सुलट चर्चांना उधाण आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांची भेट
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतल्याचे सांगितले.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही शुक्रवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळेही चर्चेला उधाण आले होते. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी या भेटीबद्दल खुलासा करताना ही भेट रयत शिक्षण संस्थेबाबत असल्याचे म्हटले. ही भेट पूर्वनियोजित होती. माझ्यासोबत रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारीही होते. या भेटीत रयत शिक्षण संस्थेबाबतच चर्चा झाली, असे ते म्हणाले.



