जेरूसलेम : वृत्तसंस्था
हमास इस्रायल युद्धात हमासचा कमांडर अहमद अल घन्दोर याच्यासह तीन वरिष्ठ नेते मारले गेल्याची माहिती हमासने दिली आहे. हमासचे हे चौघेही जण इस्रायलशी लढणाऱ्या अल कासम ब्रिगेडचे असून त्यामुळे हमासला मोठा धक्का बसला आहे.
हमासाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या हमास- इस्रायल युद्धात इस्रायली फौजांच्या हल्ल्यात हमासच्या काही वड्या नेत्यांचा मृत्यू झाला. त्यात हमासच्या नॉर्दर्न कमांडचा कमांडर अहमद अल घन्दोर याचा समावेश आहे. तो हमासच्या मिलिटरी कौन्सिलचा सदस्य होता. घन्दोर हा अबू अनास या नावानेही ओळखला जायचा. अमेरिकेने २०१७ मध्ये त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. याशिवाय अल कासम ब्रिगेडच्या रॉकेट विभागाचा प्रमुख आयमान सिय्यम याचाही समावेश आहे.
ओलिसांचे हस्तांतरण सुरूच
इस्रायलच्या ओलिसांच्या सुटकेसाठी लागू केलेली शस्त्रसंधी सुरू आहे. हमास रेड क्रॉसच्या मदतीने काही ओलिसांची सुटका करत आहे व त्या बदल्यात इस्रायलच्या कैदेत असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जात आहे. रविवारी इस्रायलने ३९ पॅलेस्टिनींची तर हमासने १३ इस्रायलींची यादी इजिप्तच्या प्रतिनिधींकडे सोपवली. त्या सर्वांची सुटका केली जाणार आहे.




