पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू हरभरा ज्वारी कांदा मिरची भात अशा पिकांना मोठे नुकसान झाले आहे .राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय नुकसान झाले याचे सविस्तर बातमी पुढील प्रमाणे…
नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाचा बळी
नंदुरबारमध्ये अवकाळीचा बळी गेलाय…नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील जावदे येथे वीज पडून एका तरूणीचा मृत्यू झालाय…सपना ठाकरे असं या तरूणीचं नाव आहे…शेतात काम करत असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वा-यासब विजेच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली…यादरम्यान वीज कोसळून सपना ठार झाली.
वाशिमला अवकाळी पावसानं झोडपलं
वाशिमलाही अवकाळीने झोडपून काढलंय… मध्यरात्रीपासून वादळी वा-यासह पाऊस पडतोय…अनेक गावांत वीज गेलीये…रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा मानोरासह वाशिम तालुक्यातही जोरदार पाऊस सुरूये…पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
नाशिकला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका
नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय… गारपिटीमुळे निफाड, येवला, चांदवडमध्ये मोठं नुकसान झालंय.. द्राक्षबागांना तसंच मका पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय.. जोरदार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा पाऊस झाल्याने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय..निफाड तालुक्यातल्या कसबे सुकेणे, पिंपळगाव बसवंत, रसलपूर, पिंपरी लोणवडीमध्ये गारपिटीने अतोनात नुकसान केलंय.. तर दिंडोरी, कळवण, सटाणा आणि नांदगाव तालुक्यातही सर्वाधिक पाऊस कोसळल्याने पिकांना फटका बसलाय.. पालकमंत्री दादा भुसेंनी शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.
पावसामुळे नंदुरबार बाजार समिती 3 दिवस बंद
नंदुरबार जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद ठेवण्यात येणारेय. पावसामुळे शेतीमालाचं, व्यापा-यांचं नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बाजार समितीतील मिरची आणि धान्याचे बाजार तीन दिवस बंद राहणार आहे.
दक्षिण गुजरातसह सौराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा
गुजरातच्या दक्षिण भागासह सौराष्ट्राला पावसाचा तडाखा बसलाय. मोरबीमध्ये जोरदार गारपीट झालीय. अनेक भागांत गारांचा सडा पडलाय. आज आणि उद्या मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तवलीय. वलसाड, नवसारी, सूरत, डांग आणि तापी जिल्ह्यासह भावनगर, बोटाद आणि अमरेली मध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा हुरड्याला फटका
संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातही काल संध्याकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या तालुक्यातील नरसापुर आणि परिसरात हुरड्याचं चांगलं उत्पादन असतं मात्र या अवकाळी पावसाने हुरड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हुरडा पूर्णपणे पावसामुळे भूईसपाट झाला आहे.
हिंगोलीत अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान
हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्रीपासून वादळी वा-यांसह अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलाय…कपाशीचं पीक भीजून खराब झालंय…तर तूर आणि ज्वारी भूईसपाट झालीये…भाजीपाला पिकाचंही मोठं नुकसान झालंय…तर हरभ-याच्या दुबार पेरणीचं संकट शेतक-यांसमोर उभं राहिलंय.
ठाणे जिल्हा: अवकाळी पावसामुळं भातशेतीचं नुकसान
वसईला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय… मुसळधार पावसामुळे पूर्व वसईतील भात शेतीचं मोठं नुकसान झालंय… हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावून घेतलाय. काढणीला आलेलं भातपीक उद्ध्वस्त झालंय. संपूर्ण उभं पीक आडवं झालंय. तर शेतीत पाणी साचल्यानं रब्बी पिकाचंही नुकसान नुकसान झालं. पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.



