(पौड प्रतिनिधी ) – गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने भावकितील एकाच्या पाळीव कुत्र्याला पिस्तुलातून गोळी झाडुन ठार मारल्याची खळबळजनक घटना मुळशी तालुक्यातील चांदे गावात घडली. याप्रकरणी कालीदास उर्फ काळूराम बाळु मांडेकर (रा. चांदे, ता. मुळशी, जि. पुणे) याच्या विरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्याचे मालक अजय ज्ञानेश्वर मांडेकर (वय २१ वर्षे, रा. चांदेगाव, ता.मुळशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय मांडेकर यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत आरोपीने २५ नोव्हेंबर रोजी मोती नावाच्या पाळीव कुत्र्यावर त्यांच्या जवळील पिस्तुला मधुन गोळी झाडली होती. यात मोती या कुञ्याचा जागेवर मृत्यू झाला आहे.
कालिदासकडे असलेले पिस्तुल नेमकं परवाना असलेले आहे की बेकायदेशीरपणे बाळगले आहे याचा तपास पोलिस करत आहे. शिवाय कुत्र्याला ठार केले त्यावेळी त्यासोबत आणखी काही साथीदार होते का ? या गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल व गाड्या याचा शोध लावून आरोपीला गजाआड करण्याचे मोठे आव्हान पौड पोलिसांसमोर असून घटनेनंतर तो फरार झाला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम हे करत आहेत.
कोण आहे हा कालिदास…
कालिदासची पत्नी प्रतीक्षा ही चांदे ग्रामपंचायतची माजी सरपंच व विद्यमान सदस्य आहे.त्यामुळे त्याला मुळशीतील एका बड्या नेत्याचा वरदहस्त आहे. कालिदास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सुसमध्ये करोडो रुपयांच्या एका जमिनीचा ताबा घेण्यासाठी त्यानी काही गुंडाच्या मदतीने एका कुटूंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात यापूर्वीचा गुन्हा दाखल आहे.




