“तेलंगणात सत्तांतराचे वारे वाहू लागले असून विधानसभा निवडणुकांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून तेलंगणात केसीआर यांची सत्ता संपुष्टात येत असल्याचे दिसून आले होते.
आज सकाळी निवडणूक निकाल हाती येत असताना काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर, बीआरएस दुसऱ्या क्रमांकावर असून गत निवडणुकीत केवळ १ जागा जिंकलेल्या भाजपलाही ८ ते १० जागांवर आघाडी असल्याचे दिसते. काँग्रेसच्या या आघाडीमुळे तेलंगणात काँग्रेस समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तेलंगणात काँग्रेसने ६४ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएसने ३६ जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळेच, काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणाच्या हैदराबादमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर समर्थकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. काँग्रेस कार्यालयाबाहेर एकमेकांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे, बाय बाय केसीआर.. अशी घोषणाबाजीही यावेळी काँग्रेस समर्थकांकडून करण्यात येत आहे.
तेलंगणा एकूण संख्या : ११९
भाजप : ०८
काँग्रेस : ६५
बी. आर. एस. : ३९
एम आय एम : ७




