नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. यावेळी देशभरातून अनेक मान्यवरांची विशेष उपस्थित होती. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर बोलताना नरेंद्र मोदी यांनी, ‘राम मंदिर उभारलं, पुढे काय करायचं?’ असं म्हणत पुढची दिशा स्पष्ट केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज रात्री घरोघरी रामज्योती प्रज्वलित होणार आहे. आज देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे. काल मी श्रीरामांच्या आशीर्वादाने रामसेतूच्या आरंभ बिंदूवर होतो. जेव्हा प्रभू राम समुद्रपार करण्यासाठी निघाले होते. जो एक क्षण होता ज्याने काळचक्राला बदललं होतं.. त्या क्षणाला अनुभवण्याचा माझा प्रयत्न होता.
”मी तिथे पुष्पवंदना केली. माझ्या अंतरंगात एक विश्वास जागा झाला. त्याकाळी जसं काळचक्र बदललं होतं तसंच आजही बदलणार आहे आणि शुभदिशेकडे जाणार आहे. मी ११ दिवसांच्या व्रत काळामध्ये तिथे गेलो जिथे-जिथे प्रभू श्रीरामांचा चरणस्पर्श झालेला आहे. सागरापासून शरयूपर्यंत यात्रा करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.
हे मंदिर केवळ एक देवाचं मंदिर नाही तर भारताच्या संस्कृतीचं, चेतनेचं, ऊर्जेचं स्थळ आहे. राम भारताचा विचार आहेत तर राम भारताचं विधान आहे. जेव्हा रामाची प्रतिष्ठा होते तेव्हा त्याचा प्रभाव हजारो वर्षे होत असतो.
”श्रीरामांचं भव्य मंदिर बनलं आता पुढे काय? असा प्रश्न विचारला जातो. आजच्या या वेळेवर जे दैवी आत्मे आशीर्वादासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांना असंच विदा करता येणार नाही. आज मी पवित्र मनाने अनुभव घेतोय की, काळचक्र बदलत आहे. आपल्या पिढीला त्यासाठी निवडलं गेलं आहे. हजारो वर्षांनंतर पिढ्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला लक्षात ठेवणार आहे. त्यामुळे मी म्हणतो हीच ती वेळ योग्य वेळ आहे. या पवित्र वेळेपासून आपल्याला एक हजार वर्षांची जाणीव ठेवायची आहे.”
मोदी म्हणाले, इथून पुढे आपल्याला भव्य दिव्य सक्षम भारताच्या निर्मिताची शपथ घ्यावी लागले. आपल्या अंतःकरणाला विस्तारित करावं लागेल. देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत आपल्याला विचार करावा लागेल.




