मुंबई : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मनोज जरांगे यांना आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. म्हणजेच मनोज जरांगे मुंबईत येऊ शकणार आहेत. याचं कारण मनोज जरांगेंचा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत दाखल होत आहे. तसंच आरक्षण मिळत नाही तोवर मुंबई सोडणार नसल्याचंही म्हणाले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह आझार मैदान पोलीस आणि राज्य सरकारलाही नोटीस पाठवली आहे. हायकोर्टाने आंदोलनादरम्यान पोलीस आणि राज्य शासन कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. यादरम्यान गरज वाटल्यास सदावर्ते यांना पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.



