मुंबई – शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच अजित पवार गटासोबत गेलेल्या सर्व आमदारांनी पक्षविरोधी कृती केली असेही उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यावेळी अजित पवार गटाच्या वतीने जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अजित पवारांच्या वकिलांकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यावर जयंत पाटील म्हणाले, मी प्रदेश अध्यक्ष पदावर होतो. निवडणूक झाली आणि माझी निवड झाली. २०१९ पासून मी या पदावर आहे. त्याआधी २०१८ साली माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. २०२२ साली विविध जिल्ह्यांमध्ये आणि राज्यात निवडणुका पार पडल्या. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. २०१८ साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली होती.



