चंदीगड :- आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मात देण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ज्या वेगाने आणि विश्वासाने ही आघाडी स्थापन झाली होती, तेवढ्याच वेगाने आघाडीच्या भवितव्याबाबत शंका निर्माण होताना दिसते आहे. त्याचे कारण पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनंतर आता आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना या निर्णयाची माहिती आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली. अर्थात मान यांनी पहिल्यांदाच असे वक्तव्य केले आहे असे नाही. तथापि, ममतांनी आजच बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचे जाहीर केल्यामुळे मान यांच्याही विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. आप पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व १३ जागा जिंकेल असे मान यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीत सहभागी असतानाही पंजाबमध्ये काँग्रेसशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेच संकेत त्यांनी त्यांच्या आजच्या विधानातून दिले आहेत. ते म्हणाले की मुख्यमंत्री होण्यासोबतच मी आपचा प्रदेशाध्यक्षही आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अन्य कोणत्या पक्षासोबत जागा वाटप करण्याच्या मताचा मी नाही. यावेळी निवडणुकीत पंजाबच नायक ठरणार असून १३-० असा निकाल येईल. केंद्रातील भाजप सरकारला इंडिया पर्याय ठरणार का याचा निर्णय केवळ मतदारच घेतील असेही मान यांनी म्हटले आहे.




