कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अरुण राम गौडा (Arun Ram Gowda) आणि ऐश्वर्या यांनी 22 जानेवारी रोजी म्हणजेच राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी साखरपुडा केला. अरुण आणि त्याची होणारी पत्नी ऐश्वर्या हे एकमेकांना गेल्या दहा वर्षांपासून डेट करत आहेत. आता लवकरच अरुण राम गौडा आणि ऐश्वर्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अरुण हा भगवान श्री रामाचा भक्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अरुणनं सांगितलं की तो अयोध्येत (Ayodhya) ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधणार आहे.
अरुण म्हणाला, “साखरपुडा अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला”
अरुण राम आणि ऐश्वर्या यांच्या साखरपुड्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीच उपस्थित होते. आता दोघेही याच वर्षी लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत. E-TIMES ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुण राम गौडानं सांगितलं, “प्रभू रामाचा भक्त असल्याने मला राम मंदिर उद्घाटनाच्या ऐतिहासिक दिवश साखरपुडा करायचा होता. माझा साखरपुडा हा अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला.”
पुढे अरुणनं सांगितलं, “मी आणि ऐश्वर्या दहा वर्षापेक्षा अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहोत, आम्ही पहिल्यांदा भेटलो जेव्हा आम्ही दोघे गेल्यारा बालगा थिएटर ग्रुपमध्ये सामील झालो होतो, त्यावेळी आम्ही खूप लहान होतो, आम्ही एकमेकांना पसंत करत होतो, आम्ही आमच्या संबंधित करिअरवर लक्ष केंद्रित केले होते. आता आम्हाला वाटले की आमच्या नात्याला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्याची योग्य वेळ आहे. एवढी वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला आहे.”
“ऐश्वर्या ही खूप निष्ठावान, समजूतदार आहे, माझाही रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे, मी समतोल राखण्यात किती व्यस्त आहे हे तिला माहीत आहे. या वर्षाच्या अखेरीस अयोध्येच्या भूमीत लग्न करण्याचे प्लॅनिंग आम्ही करत आहोत.” असंही अरुण म्हणाला.
पायते मंडी कादिग बंडरू या रिअॅलिटी शोमुळे अरुणला विशेष लोकप्रियता मिळाली. अरुण हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. ‘पाठीबेकू डॉट कॉम’,’लव्ह यू राच्चू’ या चित्रपटात अरुणनं काम केलं आहे.




