पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘#WakeUpPunekar लोकचळवळ
पुणे : पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी #WakeUpPunekar ही लोकचळवळ सोमवार, दि. ५ फेब्रुवारीपासून सुरू करीत आहोत, अशी माहिती ‘#WakeUpPunekar चे संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पुण्यातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी ‘#अडकलाय_पुणेकर मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रवीणकुमार बिरादार, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील, मिलिंद गवंडी आदी उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, गेल्या दहा वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदुषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात? याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल, जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. अशा उद्देशाने ‘#WakeUpPunekar’ ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील.”
पुणेकरांना भेडसावणारा ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने हाती घेत आहोत. पुण्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढते आहे. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, रूग्णालये येथे जाण्यासाठी वाहनांचा वापर अनिवार्य झालेला आहे. पार्किंगची समस्या वाढते आहे. पार्किंगच्या मुद्द्यावरून वादावादीचे प्रसंग उदभवतात. दूर अंतरावर जाण्यासाठी वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. या कारणांनी ट्रॅफिक या मुद्द्याला महत्त्व देण्यात आले आहे. शहराच्या सर्व भागातील वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे, ट्रॅफिक सिग्नल्स या ठिकाणी ‘#WakeUpPunekar चे स्वयंसेवक थांबतील आणि वाहनचालकांकडून प्रश्नावलीचा फॉर्म भरून uघेतील.




