मुंबई : पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही चर्चेत असलेला विषय आहे. हा संपूर्ण विषय शरद पवारांना माहीत होता. त्यांच्या संमतीनेच सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. मात्र शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत का आले? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली?
“अजित पवारांच्या मनात पहिल्या दिवसापासून होतं की आपण बरोबर आलं पाहिजे. २०१९ ला त्यांनी पहिला प्रयत्न करुन पाहिला पण तेव्हा काही झालं नाही. हळूहळू इकडे (शिवसेनेत) जशी अस्वस्थता वाढली तशी तिकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) अजित पवारांची अस्वस्थता वाढली. अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही. अनेक घटना घडल्या, अजित पवारांना हे लक्षात आलं असावं की त्यांच्या हातात पक्ष येण्याची सूतराम शक्यता नव्हती. अजित पवारांना त्या पक्षात कायम दुसऱ्याच क्रमांकावर रहावं लागलं असतं. नंबर वन स्थानावर त्यांना शरद पवारांनी आणलं असतं अशी सूतराम शक्यता नव्हती. त्यांना हे समजलं म्हणून ते आमच्याबरोबर आले.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.



