कोल्हापूर : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केलेले मुरलीधर जाधव हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या तिकीटाची मागणी जाहीरपणे केल्याने त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती.
- मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी संपर्क नाही
उद्या (17 फेब्रुवारी) ते समर्थक शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुरलीधर जाधव यांनी यावेळी बोलताना मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी कुठलाही संपर्क झालेला नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सुचित मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर तोफ डागली. त्यांनीच कान भरल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला आहे. समर्थक शिवसैनिकांना सोबत घेऊन येऊन कोल्हापुरातून मिरजकर तिकटीपासून अधिवेशन ठिकाणी पदयात्रेनं जाणार असल्याचे म्हटले आहे.
धैर्यशील माने, यड्रावकरांवर काय म्हणाले?
शिवसेना फुटल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोरांच्या दारात जाऊन मोर्चा काढला होता. यामध्ये त्यांनी सर्वाधिक आक्रमक भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने आणि शिरोळचे आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात घेतली होती. आता त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुरलीधर जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी
ते म्हणाले की, पक्षाची भूमिका होती म्हणून मी विरोध केला. पक्ष श्रेष्ठ आणि पक्षादेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं कोणाशी वैर नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षामध्ये कोणतं पद मिळेल म्हणून जात नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी सर्वसामान्यांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी पक्ष प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्याप्रमाणे कार्यरत राहू असे ते म्हणाले.



