सांगली : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. युती-आघाडीच्या कोणी कितीही वावड्या उठवू देत, असे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला. हातकणंगले लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे जाहीर करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
बहे-तांबवे रस्त्यावरील धारा रिसॉर्ट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ‘सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबिर’ झाले. यामध्ये शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. संजय थोरात, महेश खराडे, पोपटराव मोरे, संदीप राजोबा, ॲड. एस. यु. संदे, संजय बेले, भागवत जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार आहोत. निवडणूक सोपी नाही. ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमीकाव्याने लढावी लागणार आहे. निवडणुकीला ३८ ते ४० दिवस राहिले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. ऊस आंदोलनामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना ६५० कोटींचा फायदा झालेला आहे. चळवळीतील काम घरोघरी पोहोचवा,’ असे ते म्हणाले.



