पुणे : वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकास आणि तुळापूर येथील बलिदान स्थळ विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम अर्धवट टाकून स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिरूरचे आमदार अशोक पवार हे बाहेर पडले.
बारामती येथील नमो महारोजगार मेळावा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे तुळापूर येथे आले. या कार्यक्रमात डॉ. कोल्हे आणि आमदार पवार यांना स्थानिक लोकप्रतिनिधी असताना देखील व्यासपीठावर दुसऱ्या रांगेत बसविण्यात आले होते. तसेच कार्यक्रमाचे श्रेयही या दोघांना देण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते कार्यक्रम अर्धवट टाकून बाहेर पडले




