पुणे : ‘पुणे-नगर रस्त्यावर कायम वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे रामवाडीपर्यंत याआधीच मेट्रो सुरू व्हायला हवी होती…’ ‘थोडा उशीर झाला; पण आता कमी खर्चात वेगाने प्रवास होणार आहे…’ ‘खासगी वाहनांऐवजी मेट्रोला नक्कीच प्राधान्य देऊ. फक्त, आता वाघोलीपर्यंतचे काम लवकर सुरू करावे…’ अशा स्वरूपात रामवाडीपर्यंतच्या मेट्रोचे स्वागत करून कोंडीमुक्त प्रवासाचे समाधान पहिल्या दिवशी अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रुबी हॉल येथून रामवाडीकडे आणि रामवाडी ते रुबी हॉलकडे मेट्रो रवाना झाली. या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, आमदार सुनील टिंगरे, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, रवींद्र धंगेकर, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहिल्या फेरीपासून प्रवाशांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.




