पुणे: वातानुकूलित टॅक्सीच्या दरात ओला आणि उबर कंपनीने भाडेवाढ केलेली नाही. यामुळे कॅबचालकांकडून बेमुदत बंद सुरू आहे. ओला, उबर अन् कॅबचालकांच्या वादाचा फटका प्रामुख्याने पुणेकर प्रवाशांना बसला आहे. प्रवाशांना वेठीस धरले जात असताना प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे.
वातानुकूलित टॅक्सीच्या दरात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जानेवारी महिन्यात वाढ केली होती. वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. हे नवीन दर जानेवारी महिन्यात लागू झाले असूनही ओला, उबरने याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे कॅबचालकांनी मंगळवारपासून (ता.५) बेमुदत बंद सुरू केला आहे.




