मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी सोमवार संध्याकाळपासून महाराष्ट्रात होते. बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना होईपर्यंत त्यांनी महाराष्ट्र भाजपातील नेते आणि मित्रपक्षांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या. बैठकीत झालेल्या चर्चांनुसार भाजप ३४ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची ८ ते १० जागांवर बोळवण होऊ शकते, तर राष्ट्रवादीला ३ ते ४ जागा दिल्या जाऊ शकतात.
बुधवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश असलेली भाजपची कोअर कमिटी केंद्रीय नेतृत्वाशी पुढील चर्चा करुन उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीला दाखल झाली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महायुतीतील मित्रपक्षांना सन्मानजनक पद्धतीने सामावून घेतले जाईल आणि त्यांना योग्य आकडा दिला जाईल. प्रसारमाध्यमांनी जागांच्या संख्येवर अटकळ बांधणे थांबवावे, असेही ते म्हणाले.



