
पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता भाजपकडूनच मोहोळांविरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण काही वेळातच महापालिकेकडून हा बॅनर लगेच हटवण्यात आला आहे. यामुळे पुण्यात एका बॅनरमुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.
‘स्टॅंडिंग दिली, महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं… आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पाडणार,’ असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता. याद्वारे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुणे लोकसभेसाठीत भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची रांग आहे. यात मुरलीधर मोहोळांचं नाव आघाडीवर असल्याचे दिसते. त्यामुळे भाजपचे बाकी इच्छूक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असल्याचं या बॅनरमधून स्पष्टपणे दिसत आहे.




