महायुतीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं निश्चित आहे. अशातच महायुतीचे ३७-८-३ आणि ३४-१०-४ असे दोन कथित फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत. पहिल्या कथित फॉर्म्युलानुसार भाजपाला ३७, शिंदे गटाला ८ आणि अजित पवार गटाला ३ जागा मिळतील. तर, दुसऱ्या फॉर्म्युलानुसार भाजपाला ३४, शिंदे गटाला १० आणि अजित पवार गटाला ४ जागा दिल्या जातील असं बोललं जात आहे. यावर कोणत्याही पक्षाने अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही. तर शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांनी हे फॉर्म्युले फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी या फॉर्म्युल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकनाथ शिंदे गटाइतक्याच जागा अजित पवार गटाला द्यायला हव्यात असं वक्तव्य केलं आहे. परंतु, भुजबळांची मागणी व्यक्तीगत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.



