
बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असे चित्र रंगत असताना दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ‘लोकसभेचे नंतर, आधी आमचे पहा,’ अशी तक्रार करणाऱ्या पुरंदरच्या विजय शिवतारे यांनी आता थेट दोन्ही पवारांविरोधात दंड थोपाटल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
“बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, 50 वर्षे आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे. ‘तू कसा निवडून येतोस तेच पाहतो’, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधाची अपक्ष उमेदवार बनून बारामती लोकसभा लढवण्यासंदर्भात शिवतारे यांनी सोमवारी घोषणा केली. सध्या हे दोन्ही नेते महायुतीत एकत्र आहेत. मात्र तरीही त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत.



