
हैदराबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेसोबतच राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार असल्याने प्रत्येक पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी अभिनेते पवन कल्याण यांच्यासह भाजपशी युती केली. चंद्राबाबू नायडू जवळपास १० वर्षांनंतर एनडीएमध्ये परतले आहेत. त्यामुळे भाजपचे मिशन ४०० यशस्वी होईल का, याकडे लक्ष लागले आहे.
का बाहेर पडले होते नायडू?
२०१८ मध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. परंतु, अधिवेशनात त्याची दखल न घेतल्याने भाजप व टीडीपीतील तणाव वाढला. त्यातूनच त्यांनी एनडीएतून बाहेर पडत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला होता.




