दिल्लीतील एक लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या लग्नालाही जेवढा फौजफाटा नसतो, तेवढा पोलिसांचा लवाजमा या लग्नासाठी तैनात करण्यात आला होता. पण या लग्नात वरात नव्हती. पाव्हण्या रावळ्यांचा मान-पान वैगरे काही भानगड नव्हती. कारण लग्न होतं कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन गँगस्टरचं.
कुप्रसिद्ध गँगस्टर काला जठेडी उर्फ संदिप झांझरिया आणि अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिन्झ यांचं मंगळवारी दिल्लीच्या द्वारका येथे लग्न पार पडलं. या लग्नासाठी २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी काही गडबड होऊ नये म्हणून मेटल डिटेक्टर आणि ड्रोन्सचीही करडी नजर होती. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.
मंडोली कारागृहात असेलल्या काला जठेडीला सकाळी १० वाजता लग्न मंडपात आणलं गेलं. द्वारकामधील संतोष गार्डन येथील हॉलमध्ये हा समारंभ होत असताना त्याचा मनस्ताप मात्र स्थानिका झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानं सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच दोन-तीन दिवसांपासून परिसरात गस्त घातली होती.




