
पुणे: अजित पवार यांनी ठरवून पाडलेले नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पावरांविरोधत शड्डू ठोकला आहे. विजय शिवतारे बारामती लोकसभेसाठी अपक्ष उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सासवड येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सुनेत्रा पवारांच्या मतांवर मोठा फरक पडू शकतो.
दोन दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी पुण्यात पावरांविरोधात भाष्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजाय शिवतारेंनी आपण अपक्ष लढणार हे ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे दोन्ही पवारांचे टेन्शन वाढेल आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नरेंद्र मोदी विचार मंचाकडून बारामती लोकसभा लढणार
माझा पवार नावाला विरोध नाही तर त्या प्रवृत्तीला विरोध आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर चुकीचे काम केले आहे. सारखं सारखं त्यांनाच निवडून का द्यायचं? मागील वेळी अजित पवार यांनी पुरंदरच्या पालखी तळावर येऊन शिवतारे कसा निवडून येतो तेच बघतो, असे म्हणत समस्त पुरंदरकरांचा अपमान केला. आता त्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मी नरेंद्र मोदी विचार मंचाच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. मात्र माझ्या निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय हा आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असे शिवतारे यांनी सांगितले.




