पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेले मनसेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला राम राम केला आहे. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत चर्चा सुरू आहेत.
सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क करून प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले असल्याचे वसंत मोरे सांगत आहेत. मात्र वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी वरिष्ठ नेते जरी इच्छुक असले तरी शहरातील बहुतांश पक्षातील पदाधिकारी मात्र तितकेसे सकारात्मक नसल्याचं बोललं जात आहे.
बहुतांश वेळा नेते एखादा पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वीच दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित करत असतात. त्यामुळे पक्षप्रवेश ठरल्यानंतर राजीनामा दिला जातो. मोरे यांनी मात्र कोणत्याही पक्षाची पक्षप्रवेशासाठीची निश्चिती न घेताच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आणि आता लोकसभानिवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही तास राहिले असताना पक्षप्रवेशासाठी चाचपणी करत आहेत
.
काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी वसंत मोरे (Vasant More) यांची भेट घेऊन त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली असली तरी लोकसभेबाबत कोणतीही वाचता केली नाही. जोशी यांनी इच्छा प्रदर्शित केली असली तरी काँग्रेसमधील इतर गट मात्र मोरे यांच्या प्रवेशाबाबत तितकेचे सकारात्मक दिसत नाहीत. मोरे यांची खळखट्याकची विचारसरणी पक्ष धोरणांमध्ये बसत नसून भविष्यात वसंत मोरे यांचे खळखटाक पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात जाऊ शकते असं काँग्रेस मधील काही स्थानिक नेत्यांचे मत आहे.




