मुंबई : श्रीनिवास पवार काल काटेवाडीत जे काही बोलले ती खरंतर जुनीच पद्धत आहे. घरातील माणसं एकमेकांविरोधात उभं करण्याची जुनी पद्धत आहे. दोन सख्ख्या भावांना एकमेकांविरोधात उभं करून त्यांना वाटत असेल की आपण निवडणूक जिंकू शकतो. परंतु, वरिष्ठ नेत्यांनी (शरद पवार) एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे, जो कधीही फुटू शकतो. केवळ श्रीनिवास पवार हे अजित पवारांचं कुटुंब नाही. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ हे त्यांचं कुटुंब आहे.
अजित पवार हे आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत. त्यांना डाव आणि कपट कळत नाही. काही लोकांना वाटत असेल की अजित पवारांना घेरणं सोपं आहे. परंतु, अभिमन्यूला चक्रव्युहात अडकवण्याचा काळ गेला. हा अभिमन्यू चक्रव्यूह भेदून कुरुक्षेत्राचं रणांगण मारून नेईल आणि तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही असा विश्वास अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला.
श्रीनिवास पवार आजपर्यंत कधीही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. ते त्यांचे व्यवसाय सांभाळत होते. परंतु, आता त्यांनी राजकीय भाष्य केलं आहे. परंतु, अजित पवार यांनी याआधीच याची कल्पना देऊन ठेवली होती. अजित पवार म्हणाले होते की, कदाचित माझ्या कुटुंबातील माणसं माझ्याबरोबर नसतील. परंतु, बारामतीची जनता हाच माझा परिवार आहे असे सांगितले होते. आत्तापर्यंत अजित पवारांचं ऐकलं आता मात्र हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.



