नवी दिल्ली (पीटीआय) : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘आयक्यूएअर’ या स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता निरीक्षण संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जगातील प्रदूषित देश आणि शहरांची ही यादी २०२३ मधील असून त्यात प्रदूषित देशांमध्ये बांगलादेश पहिल्या क्रमांकावर तर पाकिस्तान दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानी आहे.
या अहवालानुसार बिहारमधील बेगुसराय हे प्रथमच जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर ठरले आहे. हवेची सर्वात खराब गुणवत्ता असलेले राजधानीचे शहर म्हणून दिल्लीचे नाव यंदाही आले आहे. सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचे नाव २०१८ पासून चार वेळा आले आहे. ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३’ या अहवालात १३४ देशांची यादी आहे. सात हजार ८१२ ठिकाणांवरील ३० हजारहून अधिक हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षण केंद्रांवरून तपशील गोळा करण्यात आला आहे.
भारतात गेल्या वर्षी पीएम (पर्टिक्युलेट मायक्रॉन – कण) २.५’चा स्तर वार्षिक सरासरी दर एक घन मीटरमागे ५४.४ मायकोग्रॅम होता. यादीत प्रथम स्थानी बांगलादेश (७९.९ मायकोग्रॅम प्रती घन मीटर) आणि दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान (७३.७ मायकोग्रॅम प्रती घन मीटर) आहे. भारत २०२२ मध्ये जगातील आठवा सर्वाधिक प्रदूषित देश होता. त्यावेळी देशाचा ‘पीएम २.५’ स्तर सरासरी ५३.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होता.




