मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील बजरंग सोनावणे हेही उमेदवारीसाठी इच्छूक होते. त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या प्राथमिक सदस्य राजीनामा दिला आहे.

नगरमध्ये आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या विचारणा साथ देत तुतारी हातात घेतली. बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणे हे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. गेल्या काही दिवसापासून सोनावणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज दुपारी साडे चार वाजता बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. आज दुपारी चार वाजता स्वत: शरद पवार यांनी बीड लोकसभा मतदार संघाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.



