
पुणे: बारामती मतदारसंघात अजित पवारांसोबतच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले असून, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी बारामती लोकसभेत सहकार्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांनी दर्शविली आहे. त्यामुळे पाटील यांचे बंड थंड होण्याची शक्यता आहे. पुढील काळात अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होण्याचे संकेत त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ‘हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही,’ अशा शब्दांत धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळे पाटील यांच्यासह कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यात अजित पवारांविरोधात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पाटील यांना मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर चर्चेला बोलाविले होते. त्यानुसार, फडणवीस-पाटील यांची बुधवारी अर्धा तास चर्चा झाली. त्या वेळी पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे उपस्थित होत्या.
हर्षवर्धन पाटलांनी या बैठकीनंतर अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करायचे आहे. माझी महायुतीवर नाराजी नव्हती. महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे तसे वातावरणही तयार झाले पाहिजे. यामुळे कार्यकर्ते देखील काम करतील. अजित पवारांशीही चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका मी फडणवीस आणि अमित शाह यांच्याकडे मांडल्याचे पाटील म्हणाले.




