
पुणे : “मी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीच्या रिंगणात असेनच” असा दावा माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केला. त्याचवेळी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवार जाहीर होताच वसंत मोरे यांनी ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरलं आहे.
‘एकदा ठरलं की ठरलं’ म्हणतं वसंत मोरे यांनी शड्डू ठोकला. वसंत मोरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु गुरुवारी रात्री काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करत पुण्यातून कसबा पेठेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे मोरेंची निराशा झाली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
मोरे लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असून विविध नेते मंडळींच्या भेटीगाठी घेत त्यांनी पर्यायांची चाचपणी सुरु केल्याचे पाहायला मिळाले. वसंत मोरे यांनी शरद पवार, संजय राऊत आदी नेत्यांची भेट घेऊन पुण्यातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु ही जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे आणि मोरे यांना काँग्रेसकडून संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोरे यांनी ‘एकला चलो रे…’ ची भूमिका घेतली आहे.




