
भारतातील क्रीडा चाहत्यांचा इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल ही मेजवानीच असतो. आयपीएल स्पर्धेच्या 17व्या हंगामाला गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे.
22 मार्च रोजी रात्री 8 वाजता स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटनानंतर चेन्नई व बंगळुरूमध्ये पहिला सामना रंगेल. कदाचित 66 दिवस चालणाऱ्या या क्रिकेटोत्सवात 10 संघ 74 सामने खेळतील. 26 मे रोजी अंतिम सामना शक्य आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीमुळे केवळ सुरुवातीच्या 21 सामन्यांचे 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. त्यानंतर उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
या खेळाडूंचे होणार पुनरागमन…
आयपीएल 2024 मध्ये अनेक खेळाडू पुनरागमन करताना दिसतील. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आता डिसेंबर 2022 नंतर खेळताना दिसणार आहे. रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तो गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. मुलगा अकायच्या जन्मानंतर किंग कोहलीची ही पहिली आयपीएल असेल तर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर शुभमन गिल गुजरात जायंट्सचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवरही जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. मिचेल स्टार्क तब्बल 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे.




