
सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांना उमेदवार शोधताना कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली आहे. अशा स्थितीत साताऱ्यात शरद पवारांकडून धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या मतदारसंघात सर्वांत सक्षम उमेदवार कोण, हे शोधण्याचं काम सुरू आहे. तो उमेदवार सर्वमान्य असेल. माझं नाव काही लोकांनी आणि मीडियाने चर्चेत आणलं आहे. मात्र शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे,” अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे.
तसंच “जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते मला भेटले. सातारा लोकसभा मतदारसंघ त्यांच्या पक्षाकडे आहे. या मतदारसंघातील उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. मात्र त्या उमेदवाराच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, असं आम्ही त्यांना जाहीरपणे सांगितलं आहे. जातीयवादी शक्तींचा या मतदारसंघात प्रवेश होऊ नये, यासाठी आम्ही आणि आमचे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत. त्यासाठी तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचं काम करायला आम्ही तयार आहोत,” असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.


