अमरावती : देवेंद्र फडणवीस यांना मोदी, शाह वेटिंगवर ठेवतात. मात्र, नवनीत राणांना ते सहज भेटतात. यावरून भविष्यात महाराष्ट्रातील भाजपाच्या सत्तेचं केंद्र नागपूरवरून अमरावतीला येणार असल्याचं वाटतंय. चंद्रकांत पाटील, सुधीर मुंगटीवार यांच्यासारखे वाटेत आडवे येणारे अनेक काटे देवेंद्र फडणवीसांनी दूर केलेत. असं असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षाही नवनीत राणा यांचं राजकीय वजन वाढताना दिसतंय. याकडं देवेंद्र फडणवीस यांनी बघायला हवं. नवनीत राणा या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ‘खतरे की घंटी’ आहे, असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना भाजपानं उमेदवारीसाठी चार दिवस वेटिंगवर ठेवलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री शाह वेळ देत नाहीत. अशा परिस्थितीत पक्षात प्रवेश करण्याआधीच नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली जाते. लगेच दुसऱ्या दिवशी अमित शाह, नवनीत राणा यांच्या भेटीचा योग जुळून येतो. त्यामुळं नवनीत राणा या भाजपाच्या सर्व नेत्यांपेक्षा शिरजोवर होताना दिसत असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.


